" वजन ९० किलोहून ६० किलो झाले "

 

माझे नाव सौ. उमादेवी मुरलीधर कुलकर्णी राहणार हैद्राबाद. माझे ५७ वर्षे असून मी २६/११/२००६ रोजी आनापानसति पिरामिड ध्यान शिकले. त्यानंतर माझा पुर्नजन्मच झाला. त्यामुळेच मी माझे वय ५ वर्ष सांगते. ध्यान सुरू करण्यापुर्वी माझे वजन होते ९० किलो होते पण आता ६० किलो झालेले आहे. संपूर्ण शरीर रोगग्रस्त होते. मधुमेह, उच्च रक्तदाब, यांच्या सोबतच पाय डिसलोकेट झाल्याने केलेल्या ऑपरेशनमुळे अंगावर सुज होती. रोज १४ गोळया घ्याव्या लागत असत. मी श्री. रामदेव बाबांच्या शिबिरात कसेबसे ३ दिवस काढले. पण ४ थ्या दिवशी घरी परतावे लागले.

 

आमच्या लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये येऊन सिनियर पिरामिड मास्टर नरेंद्र मुधोळकर यांनी 40 दिवसांचा आनापानसति पिरामिड ध्यान वर्ग सुरू केला. ते माझे पहिले गुरू ! पण मी त्यांचा अनुग्रह घेतला नाही की नमस्कार केला नाही. ध्यानाच्या पहिल्याच दिवशी फार छान अनुभव आला. सुंदर निसर्ग दृश्ये दिसली. मी गांधीवादी असल्यामुळे घरातील सर्व कामे स्वत:च करते. स्वावलंबनामुळे घरात कामाला बाई नाही.


दुसर्‍या दिवशी संध्याकाळी ५ वाजता शेजारपाजारच्या ४-५ बायकांना बोलावून समुह ध्यान केले. तेव्हा शरीर कापसासारखे हलके झाले. कमरेचे दुखणे कोणीतरी चमच्यातून काढून घेतले असे वाटले. सरांना हा अनुभव सांगितल्यावर ते म्हणाले, दुध तापवून विरजण लावायला तयार आहे, थोडे दही लावल्यावर त्याचे दही बनून लोणी तयार होईल.

 

एकेदिवशी ध्यानात तीन स्त्रीया दिसल्या. त्या, मी लक्ष्मी, मी पार्वती, मी सरस्वती असे सांगून अदृश्य झाल्या. मागे वळून पाहिले तर पाठीमागे ब्रम्हर्षि पत्रीजी! त्यावेळी जीवात्मा-शीवात्मा यांचा प्रत्यय आला. तेव्हापासुन औषधे, गोळया टाकून दिल्या.

 

मुलगा व सुन डॉक्टर असल्याने त्यांनी २-३ वेळा ब्लड टेस्टची व्यवस्था केली. पण काही ना काही कारणाने टेस्ट झालीच नाही. माझे पती एच.ए.एल. मधे नोकरीला होते. ते रिटायर झाल्यावर ५ लाख रूपये मिळाले. ते सर्व पैसे पिरामिड बांधण्यासाठी वापरायचे असे आम्ही दोघांनी ठरविले. पण घरातील व जवळच्या नात्यातील लग्नकार्यात पुष्कळसे पैसे खर्च झाले. फक्त पिरामिडसाठी व घरासाठी तेवढी जागा घेता आली.


पिरामिड लवकर व्हावा म्हणून संकल्प ध्यान केले. ध्यान वर्ग घेतले. त्या लोकांना भोजन दिले. ब्रम्हर्षी पत्रीजी सरांचे आशिर्वाद मिळाले. अनपेक्षीतपणे एच.ए.एल. कंपनीतून ग्रॅज्युइटीचे ७ लाख रूपये मिळाले. त्यातून घर आणि ११’ x ११’ चा पिरामिड बांधला. आम्ही दोघांनी स्वत:ला ध्यान प्रचार सेवेला वाहून घेतले आहे. कोणताही आजार नाही. वजन ९० किलोचे ६० किलो वर आले आहे. आनंदमय जीवन जगत आहोत. मराठी, हिंदी, तेलगु व कन्नड भाषेत ध्यान प्रचार करत आहोत.
जय पिरामिड ध्यान जगत !

 

उमादेवी मुरलीधर कुलकर्णी
हैद्राबाद

Go to top